कष्टकरी महिलांना दिवाळीची मोठी भेट! 17 हजारांचा बोनस अन् 10 लाखांचे विमाकवच
दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायतचा स्तुत्य उपक्रम ३८ वर्षांची सामाजिक बांधिलकी कायम
पुणे : बाजारपेठेतील स्वच्छता, धान्य निवडणे आणि दुकानांची साफसफाई यांसारखी मेहनतीची कामे करणाऱ्या कष्टकरी महिला कामगारांसाठी दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायत यांनी दिवाळीच्या निमित्ताने माणुसकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. स्व. डॉ. बाबा आढाव स्त्री कामगार कल्याण योजनेअंतर्गत सुमारे ८७ महिला कामगारांना प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आला. विशेष म्हणजे, यावर्षीपासून प्रत्येक महिला कामगाराला पोस्ट खात्यामार्फत वार्षिक १० लाख रुपयांचे विमासंरक्षणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत आयोजित महिला कामगारांच्या स्नेहमेळाव्यात भारतीय डाक विभागाच्या पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते बोनसचे वितरण करण्यात आले. दिवाळीच्या सणात कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतानाच त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी विम्याचे कवच देण्याचा निर्णयही यावेळी महत्त्वपूर्ण ठरला.
महिलांच्या श्रमाचा सन्मान हीच खरी सामाजिक बांधिलकी!
कार्यक्रमात बोलताना पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांनी महिला कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले. बाजारपेठेतील दुकाने आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला कामगार पार पाडतात. त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांचा सन्मान करण्याचे काम दि पूना मर्चेंट्स चेंबर करीत आहे. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला कामगारांनी पोस्ट विभागाच्या विविध विमा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी चेंबर आणि हमाल पंचायत यांच्यातील दीर्घकालीन सहकार्याचा उल्लेख केला. तर चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी या योजनेमागील सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली.
सरकारी अनुदानाशिवाय ३८ वर्षांपासून योजना सुरू!
राजेंद्र बाठिया म्हणाले की, दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायत यांच्या सहकार्याने गेल्या ३८ वर्षांपासून कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय ही योजना राबविण्यात येत आहे. व्यापारी बांधवांच्या सहकार्याने महिला कामगारांच्या श्रमाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी योगदान देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. बाजारपेठेत धान्य निवडणे, दुकानांची साफसफाई आणि स्वच्छतेची कामे करणाऱ्या महिलांना दरवर्षी दिवाळी बोनस देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली जाते.
या कार्यक्रमाला चेंबरचे सचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, प्रवीण चोरबेले, उत्तम बाठिया, नवीन गोयल, दिनेश मेहता, संदीप शहा, हरिराम चौधरी, स्त्री कामगार कल्याण योजना समितीचे अध्यक्ष शाम लढ्ढा, उपाध्यक्ष महिपालसिंह राजपुरोहित, मुकेश शहा, सचिन गोयल, किरण गुजर तसेच हमाल पंचायतचे चंद्रकांत मानकर आदी उपस्थित होते.
बोनससोबत आता १० लाखांचे विमाकवच!
महिला कामगारांना केवळ दिवाळी बोनस देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचाही विचार करण्यात आला आहे. दि पूना मर्चेंट्स चेंबर आणि हमाल पंचायत यांनी यावर्षीपासून प्रत्येक महिला कामगाराला पोस्ट खात्यामार्फत वार्षिक १० लाख रुपयांचे विमासंरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील स्वच्छता, धान्य निवडणे आणि अन्य कष्टाची कामे करणाऱ्या महिलांना आर्थिक संकटाच्या काळात आधार मिळण्यास मदत होणार आहे. ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाला विमासंरक्षणाची जोड मिळाल्याने महिला कामगारांच्या कल्याणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.