लाडू हातात घेत मुंढेंनी केली तपासणी! व्यापाऱ्यांना त्रास नव्हे, नियम पाळणाऱ्यांना प्रोत्साहन; FDA आयुक्तांचा स्पष्ट संदेश
दिवाळीच्या फराळाच्या दर्जावर FDAचे लक्ष दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी घेण्याचे व्यापारी संघटनांना आवाहन
पुणे | एपीएमसी न्यूज़ नेटवर्क | दिवाळीच्या सणाला नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि रास्त दरात फराळ उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक व्यावसायिकाची जबाबदारी असून, व्यापाऱ्यांना त्रास देणे नव्हे, तर नियमांचे पालन करणाऱ्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे हेच प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, असा स्पष्ट संदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. पुण्यातील दि पूना मर्चंट्स चेंबरच्या ३८ वर्षांपासून सुरू असलेल्या लाडू-चिवडा उपक्रमाचे उद्घाटन करताना त्यांनी स्वतः लाडू हातात घेऊन त्याची गुणवत्ता तपासली. चिवड्यासाठी वापरण्यात येणारे जिन्नस, उत्पादन प्रक्रिया आणि पॅकिंगवरील माहितीचीही त्यांनी पाहणी केली.
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करताना मुंढे यांनी या उपक्रमांतर्गत सुमारे दोन हजार फूड हँडलर्सना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिली. उत्पादन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तांत्रिक पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, उत्पादन सुरू असेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी व्यापारी संघटनांनी घ्यावी, असे सामाजिक आवाहनही मुंढे यांनी यावेळी केले.
गंगाधामजवळील मार्केट यार्ड परिसरातील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नागुश्री सभागृहात रविवारी (१ नोव्हेंबर) सकाळी हा कार्यक्रम पार पडला. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायुकुमार नहार यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
उत्पादनापासून पॅकिंगपर्यंत गुणवत्ता आवश्यक
अन्न उत्पादन करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाकडे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, त्याचे प्रमाण, उत्पादन प्रक्रिया, स्वच्छता, पॅकेजिंग, घटकांची माहिती, उत्पादन तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख यांची योग्य नोंद ठेवली पाहिजे. भविष्यात एखादी तक्रार किंवा समस्या उद्भवल्यास संबंधित उत्पादनाचा मागोवा घेता आला पाहिजे, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी वेगवेगळे गुणवत्ता निकष ठेवण्याऐवजी प्रत्येक ग्राहकाला समान दर्जाचे आणि सुरक्षित अन्न मिळाले पाहिजे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्यांना प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
३८ वर्षांच्या परंपरेवर गुणवत्तेचा शिक्कामोर्तब
दि पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या काळात रास्त दरात लाडू-चिवडा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जातो. यंदा अन्न प्रशासनाने उत्पादन प्रक्रियेबाबत काही सूचना केल्या होत्या. चेंबरने त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी केल्याबद्दल मुंढे यांनी समाधान व्यक्त केले.
चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, “चेंबर पूर्वीपासूनच अन्न प्रशासनाच्या नियमांचे पालन करून लाडू-चिवडा तयार करते. यंदा अन्न प्रशासन कायद्यातील नव्या नियमांची माहिती आयुक्त मुंढे आणि अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानुसार सर्व नियमांची पूर्तता केली. आयुक्तांनी लाडू फोडून त्याची गुणवत्ता तपासली. चिवड्यासाठी लागणारे जिन्नस आणि पॅकिंगवरील माहितीही पाहिली. त्यांनी समाधान व्यक्त केल्याने चेंबरच्या गुणवत्तापूर्ण कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.”
माजी लोकसभा सदस्य श्रीनिवास पाटील यांनी गेल्या ३८ वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवल्याबद्दल चेंबरचे कौतुक केले.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या भोजनाची जबाबदारी घ्या!
दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबांतील अनेक विद्यार्थी शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यात येतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना शिक्षणासोबत भोजनाचा खर्च भागविणेही कठीण होते. त्यामुळे व्यापारी संघटना, चेंबर आणि कंपन्यांनी सीएसआर निधीतून अशा विद्यार्थ्यांना जून-जुलैपर्यंत मोफत किंवा सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून द्यावे. पैशांअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी व्यापारी वर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केले. या आवाहनाला चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
व्यापारी-अन्न प्रशासन समन्वयासाठी दरमहा बैठका
अन्न प्रशासन आणि व्यापाऱ्यांमधील समन्वय वाढविण्यासाठी व्यापारी प्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची विनंती चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी केली. त्याला प्रतिसाद देताना मुंढे यांनी अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दरमहा विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी भेटून चर्चा करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकांमध्ये व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
मान्यवरांचा सत्कार
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना अबनावे यांचा सत्कार करण्यात आला. लाडू-चिवडा उपक्रमाचे ३८ वर्षांचे साक्षीदार व मार्गदर्शक विठ्ठलशेठ मणियार, जितो इंटरनॅशनलच्या पुणे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनोज छाजेड, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, निकिता बाठिया, सिद्धार्थ हॉस्पिटलचे डॉ. विजय सेटिया, पप्पू महाराज, ताराचंद व हेमंत गौड, फूड कन्सल्टंट सोनाली पवार आणि नागुश्री सभागृहाचे अचल जैन यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत सचिव ईश्वर नहार यांनी केले. अध्यक्षीय प्रास्ताविक राजेंद्र बाठिया यांनी केले, तर सहसचिव आशिष दुगड यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उत्तम बाठिया यांनी केले. यावेळी हमाल पंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते असोसिएशन, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.