मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी मुसळधार
Rain Update:मुंबई 
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, रायगडसह राज्यातील विविध भागांत मंगळवार सकाळपासून पावसाने जोर धरला. आतापर्यंत पावसाची प्रतीक्षा असलेल्या मुंबईतही अखेर पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, उपनगरं आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांसाठी मुंबईला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले आहे. २४ ते २७ जूनदरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही अंतर्गत भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे रस्ते, ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहताना दिसले. वेजापूर तालुक्यात गळमोडी नदीला पूर आल्याने छोटा पूल वाहून गेला, तर महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. जालना परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
एकूणच, मुंबईसह महाराष्ट्रभर मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून, पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.