राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCतील ‘भुताटकी’ पाण्याची टाकी 2 कोटी खर्चूनही एक थेंब पाणी नाही!
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात पाणीटंचाई, तर कोट्यवधींची टाकी धुळखात प्रशासनावर प्रश्नचिन्ह
2 कोटींची टाकी, शून्य उपयोग! APMCच्या कारभारावर बाजारघटकांचा संताप
APMC प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार? 26 वर्षांपासून निष्प्रयोज्य पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत
कोणत्याही क्षणी दुर्घटनेची भीती NMMC व APMC प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
Water Tank News: 
राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई APMCच्या मसाला मार्केट आणि मध्यवर्ती इमारत क्रमांक 2 परिसरात बाजारघटकांना आजही सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. एकीकडे व्यापारी आणि ग्राहकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना, दुसरीकडे याच समस्येवर उपाय म्हणून तब्बल 26 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची पाण्याची टाकी आज धुळखात पडल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन 2000 मध्ये बाजारघटकांना नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने बाजार समिती प्रशासनाने सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून भव्य पाण्याची टाकी उभारली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या टाकीत आजपर्यंत एकदाही पाणी साठवण्यात आले नसल्याची चर्चा बाजार परिसरात सुरू आहे.
सततच्या दुर्लक्षामुळे टाकीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून बांधकामाचे अनेक भाग उखडू लागले आहेत. त्यामुळे ही टाकी कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती बाजारघटक व्यक्त करत आहेत. टाकीच्या परिसरातून मसाला मार्केटचा मुख्य रस्ता जात असून, जवळच मर्चंट चेंबरमध्ये दररोज मोठ्या संख्येने व्यापारी आणि ग्राहकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या जागेवर ही टाकी उभारण्यात आली आहे त्या जागेची नोंद संबंधित प्राधिकरणांच्या अभिलेखांमध्ये नसल्याचाही दावा केला जात आहे. तसेच टाकी उभारण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे त्या काळातील प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
26 वर्षांपासून टाकीचा कोणताही उपयोग झाला नसल्याने या प्रकल्पामागील उद्देशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बाजार परिसरातील काही बाजारघटकांमध्ये, “ही टाकी खरोखर पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आली होती की केवळ ठेकेदारांना फायदा करून देण्यासाठी आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला होता?” अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला प्रकल्प 26 वर्षांपासून निष्प्रयोज्य पडून राहिल्याने बाजार समितीच्या आर्थिक नियोजनावरही टीका होत आहे. बाजारघटकांच्या मते, ज्या उद्देशासाठी टाकी उभारण्यात आली तो उद्देश आजतागायत पूर्ण झालेला नाही, उलट ही टाकी आता धोकादायक ठरत आहे.
यामुळे संबंधित यंत्रणांनी या टाकीची तातडीने संरचनात्मक तपासणी करून आवश्यक असल्यास ती पाडावी तसेच या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बाजार परिसरातून जोर धरत आहे.