राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमध्ये पाण्याचा बोजवारा? बाजार घटकांना टंचाई, सार्वजनिक ठिकाणी लाखो लिटर पाण्याचा वापर!
भाजीपाला व फळ बाजारात ५ लाख लिटर टाकी असूनही बाजार घटकांना पाणी का मिळत नाही ? APMCतील पाणी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
पिण्याचे पाणी कुणासाठी? व्यापाऱ्यांना १५ मिनिटे, प्रसाधनगृहांना आणि आस्थापनांना लाखो लिटर पुरवठ्याचा आरोप
APMCमध्ये पाण्याची उधळपट्टी की गैरव्यवस्थापन? अनधिकृत वास्तव्य आणि पाणी वापराबाबत चौकशीची मागणी
NMMC आणि APMC प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Apmc Water News एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असताना, राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCच्या भाजीपाला व फळ मार्केटमधील पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका बाजूला व्यापारी, माथाडी कामगार आणि वाहतूकदारांना पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आरोप बाजारातील घटकांकडून करण्यात येत आहेत.
बाजार घटकांच्या म्हण्यानुसार या भाजीपाला व फळ मार्केट परिसरातील अनेक गाळ्यांवर अनधिकृत बांधकाम करून वास्तव्यास असलेल्या सुमारे ५ ते ६ हजार लोकांमुळे पाणी वापरात मोठी समस्या निर्माण   झाली आहे. या अनधिकृत वास्तव्यासोबतच मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याने बाजारातील नियमित घटकांना त्याचा फटका बसत असल्याचा दावा केला जात आहे.
याशिवाय भाजीपाला व फळ मार्केटमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये प्रत्येकी सुमारे २० हजार लिटर क्षमतेच्या टाक्या बसविण्यात आल्याचे सांगितले जाते. दोन्ही मार्केटमध्ये मिळून जवळपास १० सार्वजनिक प्रसाधनगृहे असून, त्यासाठी दररोज अंदाजे २ लाख लिटर पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचा आरोप बाजारातील व्यापाऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही मार्केटसाठी असलेल्या मुख्य जलटाकीची क्षमता सुमारे ५ लाख लिटर आहे. तरीही दोन हजारांहून अधिक व्यापारी गाळ्यांना दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटेच पाणीपुरवठा केला जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक प्रसाधनगृहे तसेच फुटपाथलगत असलेल्या कॅन्टीन, ज्यूस सेंटर, हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जात आहे. सकाळी, संध्याकाळी आणि रात्री अशा अनेक वेळा पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
यातील अनेक हॉटेल व कॅन्टीन चालकांनी वाढीव बांधकाम करून जागा इतरांना भाड्याने दिल्याची चर्चा असून त्यामुळे पाण्याचा वापर आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. पाण्याचे मीटर बसविण्यात आले असले तरी त्यांचा प्रभावी वापर किंवा नियंत्रण होत नसल्याचा आरोप बाजारातील घटकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा वापर नेमका कोणासाठी आणि किती प्रमाणात होत आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार आणि वाहतूकदारांचे म्हणणे आहे की, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांसाठी किंवा इतर वापरासाठी पर्यायी जलव्यवस्था उभारून पिण्याचे पाणी बाजारातील घटकांसाठी राखून ठेवावे, अशी मागणी होत आहे.