एकीकडे गणपतीचा ढोल-ताशांचा दणदणाट; दुसरीकडे ज्वेलर्सवर चोरट्यांचा डल्ला!
फळाच्या गाळ्यातून भिंतीला भगदाड पाडून मेघना ज्वेलर्समध्ये प्रवेश चांदीचे दागिने व रोकड लंपास, तिजोरी फोडताना अलार्म वाजल्याने सोन्याचे दागिने वाचले. Apmc पोलीसांकडून तपास सुरू
नवी मुंबई : एकीकडे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा ढोल-ताशांचा दणदणाट… तर दुसरीकडे याच गोंगाटाचा फायदा घेत चोरट्यांनी ज्वेलर्सवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना वाशीतील कोपरी गाव परिसरात घडली. शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास शेजारच्या फळाच्या गाळ्यातून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी मेघना ज्वेलर्समध्ये प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि काही रोकड लंपास केल्याची माहिती समोर येत आहे . मात्र तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करताना अलार्म वाजल्याने चोरटे पसार झाले आणि तिजोरीतील सोन्याचे दागिने वाचले.
ढोल-ताशांचा आवाज ठरला ‘कव्हर’
गणपती विसर्जनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांचा गजर सुरू होता. याच गोंगाटाचा फायदा घेत चोरट्यांनी ड्रिल मशीन आणि हातोड्याच्या सहाय्याने भिंत फोडल्याचा संशय आहे. त्यामुळे भिंत फोडताना होणारा आवाज विसर्जनाच्या गोंगाटात दबला असण्याची शक्यता आहे. भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी थेट ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला.
२२ दिवसांपूर्वी घेतला गाळा फळ व्यापारी गायब
या घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्वेलर्सच्या शेजारील गाळा अवघ्या २२ दिवसांपूर्वी फळ व्यवसायासाठी भाड्याने घेण्यात आला होता. या गाळ्यात थोडाफार फळांचा व्यवसाय सुरू होता. याच गाळ्यातून ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, हा गाळा भाड्याने घेणारा फळ व्यापारी सध्या गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्याची भूमिका काय आहे, याचा तपास केला जात आहे. मात्र त्याचा चोरीशी थेट संबंध असल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नाही.
तिजोरी फोडताना अलार्म चोरट्यांचा डाव फसला
ज्वेलर्समधील सोन्याचे दागिने तिजोरीत ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केल्यावेळी अलार्म वाजल्याने त्यांनी तेथून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे तिजोरीतील सोन्याचे दागिने सुरक्षित राहिले. मात्र दुकानातील चांदीचे दागिने आणि काही रोकड चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
गाळा भाड्याने देताना पडताळणी झाली होती का?
या घटनेनंतर गाळा भाड्याने देण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. गाळा भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची पोलीस पडताळणी करण्यात आली होती का? त्याने ओळखपत्र, कायमचा पत्ता आणि इतर आवश्यक कागदपत्रे दिली होती का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
CCTV, घटनास्थळावरील पुरावे तपासणीखाली
घटनेची माहिती मिळताच Apmc पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या हालचालींची माहिती तपासली जात आहे. चोरीमध्ये नेमके किती जण सहभागी होते, त्यांनी या घटनेचे नियोजन आधीपासून केले होते का आणि फळाचा गाळा भाड्याने घेण्यामागे काही वेगळा उद्देश होता का, या सर्व शक्यतांचा तपास APMC पोलिसांकडून सुरू आहे.