तुकाराम मुंढे एक्शन मोडवर मुंबई APMCतील दोन पान टपऱ्या सील
-मुंबई APMC आता रडारवर
-APMCत उघडपणे तंबाखू विक्री आता भेसळखोरांवरही कडक कारवाई
-तोंडाच्या कर्करोग तपासणीत धक्कादायक वास्तव उघड ,३८९ पैकी ७५ जण पॉझिटिव्ह, २१ जण गंभीर
नवी मुंबई : मुंबई APMC परिसरातील वाढत्या गुटखा आणि तंबाखू विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण APMC मार्केट रडारवर घेतले आहे. फळ मार्केटमध्ये कारवाई करत दोन पान टपऱ्या सील करण्यात आल्या असून गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे APMC परिसरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबई APMCच्या फळ व मसाला मार्केटमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय तोंडाच्या कर्करोग पूर्वतपासणी शिबिरात धक्कादायक आकडे समोर आले. एकूण ३८९ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल ७५ जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह आढळले, तर २१ संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना तातडीने पुढील उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
APMCतील भाजीपाला, फळ, मसाला, धान्य तसेच कांदा-बटाटा मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि उघडपणे खाद्यपदार्थ विक्री होत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अन्न व औषध प्रशासनाकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी काही दिवसांनी पुन्हा त्याच प्रकारे विक्री सुरू होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर FDA प्रशासनाने आता अधिक आक्रमक भूमिका घेतली असून केवळ गुटखा विक्रेत्यांवरच नव्हे, तर उघडपणे खाद्यपदार्थ विक्री करणारे आणि भेसळ करणाऱ्यांवरही कडक कारवाईची तयारी सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानंतर APMC परिसरात मोठी मोहीम राबवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.