जालना जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांची भेंडी थेट लंडन, कॅनडा आणि जर्मनीत, गटशेतीच्या बळावर घडवली यशोगाथा
जालना | शेती म्हणजे तोट्याचा व्यवहार, अशी धारणा मोडीत काढत जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील २७ शेतकऱ्यांनी गटशेती आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली सेंद्रिय भेंडी आता थेट कॅनडा, जर्मनी आणि लंडनच्या बाजारपेठेत निर्यात होत असून मराठवाड्यातील ही यशोगाथा राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शोभानगर परिसरातील २७ शेतकऱ्यांनी एकत्र येत गटशेतीचा प्रयोग सुरू केला. जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी रासायनिक अवशेषमुक्त सेंद्रिय भेंडीचे उत्पादन सुरू केले. सुरुवातीला गुणवत्ता, निर्यात निकष, बाजारपेठ आणि वाहतूक यांसारखी अनेक आव्हाने होती. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य नियोजनामुळे त्यांना यश मिळाले.
या भेंडीची निर्यात मुंबईस्थित ‘थ्री सर्कल ॲग्रो एक्सपोर्ट’ कंपनीमार्फत केली जाते. शेतातून काढलेली भेंडी नाशिक येथील पॅकहाऊसमध्ये वर्गीकरण व पॅकिंग करून मुंबई विमानतळावरून थेट परदेशात पाठविली जाते. कंपनीकडून सेंद्रिय औषधे मोफत उपलब्ध करून दिली जातात, तसेच वाहतुकीचाही खर्च उचलला जात असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे.
भेंडी हे अल्पकालीन पीक असल्याने लागवडीनंतर अवघ्या ४५ दिवसांत उत्पन्न सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जलद आर्थिक परतावा मिळत आहे. या प्रकल्पातील शेतकरी संभाजी काकडे यांनी दोन एकरांत सेंद्रिय भेंडीची लागवड करून सुमारे दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.
दुष्काळी मराठवाड्यात ठिबक सिंचन, पाणी व्यवस्थापन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून कमी पाण्यातही भरघोस उत्पादन घेण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. या उपक्रमामुळे गावातील महिलांनाही भेंडी तोडणी, वर्गीकरण आणि पॅकिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे व कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेणे शक्य झाले. भेंडीसोबतच सिमला मिरची, टोमॅटो यांसारख्या उच्च मूल्याच्या पिकांची लागवड करून उत्पन्नाचे विविध स्रोतही निर्माण करण्यात आले आहेत.
सध्या भेंडीला सुमारे २५ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून भविष्यात आणखी देशांमध्ये निर्यात वाढवण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. गटशेती, सेंद्रिय उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधल्यास शेतीही जागतिक स्तरावर यशस्वी होऊ शकते, हे पिठोरी सिरसगावच्या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.