राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC सचिव जरे यांची शिस्तबद्ध कारभाराची पोलखोल? पहिल्याच पावसात बाजार जलमय.
कोट्यवधींची कामे, तरी बाजारात पाणीच पाणी
भाजीपला ,फळ मार्केटच्यागेटवर लाखांचा रस्ता, पण गेटवर तुंबले पाणी
गटरलाइनवर कोटींचा खर्च निचरा मात्र ठप्प
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारातील आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह.
Water Logging Apmc:राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा असलेल्या मुंबई APMCमध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नालेसफाई, गटरलाइन आणि रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे बाजारातील व्यापारी, हमाल, कामगार आणि ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भाजीपाला व फळ मार्केटमधील मुख्य प्रवेशद्वारावर पावसाचे पाणी तुंबल्याने ग्राहक आणि बाजार घटकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वी या गेटसमोरील रस्ता खोदून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले होते. या कामासाठी सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याची चर्चा असून, तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी साचल्याने या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे मसाला मार्केटमध्येही रस्ते आणि पावसाळी गटरलाइनच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे दिसून येत आहे. गटरलाइनची लेव्हल योग्य न ठेवल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसून रस्त्यांवर पाणी साचत आहे. यामुळे बाजारातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे.
यापूर्वीही बाजारातील विविध विंगमधील गटरलाइनच्या कामांवर अंदाजे ६ ते ८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र एवढा खर्च करूनही आजही पाण्याचा निचरा होत नसल्याने या कामांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे यावर चौकशी होणार का, असा प्रश्न बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे प्रभावीपणे झाली नसल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी, राष्ट्रीय महत्त्वाच्या या बाजारातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पहिल्याच पावसात बाजाराची ही अवस्था असेल, तर आगामी मुसळधार पावसात संपूर्ण बाजार परिसर पाणी आणि घाणीच्या विळख्यात जाण्याची भीती बाजार घटकांकडून व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.