राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC भाजीपाला मार्केट मध्ये धक्कादायक प्रकार, कचऱ्यातील भाज्यांचे पुन्हा पॅकिंग, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ?
APMC प्रशासनाचे दुर्लक्ष की संगनमत? सडलेल्या भाज्यांमधून वेगळा माल काढून पुन्हा विक्रीचा आरोप
राष्ट्रीय बाजाराची लाजिरवाणी अवस्था कचरा, घाण आणि सडलेल्या भाज्यांचा उघड्यावर व्यवहार
सचिवांची   सेस वसुलीवर भर, स्वच्छतेकडे दुर्लक्ष? मुंबई APMCतील धक्कादायक वास्तवाने उभे केले गंभीर प्रश्न
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारातील गैरव्यवस्थेमागे नेमकं काय? APMC सचिवांच्या कारभारामुळे पणन मंत्री तथा राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष जयकुमार रावल यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा.
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळालेल्या मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. मार्केटमध्ये कचरा व्यवस्थापनाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात सडलेला व टाकाऊ भाजीपाला उघड्यावर टाकला जात असल्याचे दिसून येत आहे.
समोर आलेल्या हा व्हिडिओ 27 जून रोजीच्या आहे. व्हिडिओमध्ये   तुम्ही पाहू शकता कचऱ्यातील सडलेल्या भाज्यांमधून टमाटे, भेंडी, फ्लॉवर, चायनीज भाज्या, तोंडली, पत्ता गोबी, कढीपत्ता आदी भाज्या वेगळ्या करून त्याच ठिकाणी पुन्हा जाळ्या आणि पिशव्यांमध्ये पॅक केल्या जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर हा भाजीपाला किरकोळ विक्रेत्यांकडे पाठवला जात असून, तोच माल सर्वसामान्य ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जात आहे.
या प्रकारामुळे अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बाजारात उघडपणे सुरू असतानाही व्यापारी प्रतिनिधी आणि APMC प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.
राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळाल्यानंतर बाजारात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, शौचालयांची देखभाल आणि मूलभूत सुविधा सुधारतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी कायम असल्याचे चित्र असल्याचा आरोप बाजारातील व्यापारी आणि बाजार घटक करत आहेत.
बाजार घटकांच्या म्हणण्यानुसार, पणन मंत्री जयकुमार रावल हे मुंबई APMCचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मुंबई APMCच्या सचिव शरद जरे यांना राज्याचे पणन संचालक पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे दोन्ही महत्त्वाच्या पदांचा कार्यभार असल्याने बाजारातील मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, जरे यांनी बाजारातील सेस वसुली वाढवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून महसूल वसुलीवर विशेष भर दिला आहे. सेस वसुलीसाठी ज्या पद्धतीने लक्ष्य निश्चित केले जाते, त्याच पद्धतीने स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नालेसफाई, शौचालयांची देखभाल आणि अन्नसुरक्षेलाही प्राधान्य दिले जावे, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित इतके गंभीर प्रश्न निर्माण होत असताना प्रशासन नेमके काय करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि बाजारातील स्वच्छता व अन्नसुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी व्यापारी, बाजार घटक आणि नागरिकांकडून जोर धरत आहे.