राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई एपीएमसी अभियांत्रिकी विभागाचे भोंगळ कारभाराच्या फटका बाजार घटकांना
भाजीपाला मार्केटमध्ये पावसाचा कहर 70 लाखांचे काँक्रीट काम पाण्यात?
जावक गेट जलमय! काँक्रीट करण व नालेसफाई झाली तरी पाणी तुंबले, नियोजनावर प्रश्नचिन्ह
महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ, पण नियोजनशून्य कामांमुळे व्यापाऱ्यांचा संताप
70 लाख खर्च… तरी जावक गेटवर पाणीच पाणी! विकासकामांवर बाजारघटकांचे गंभीर आरोप
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात पावसाळी गोंधळ अध्यक्ष्याने लक्ष देण्याची मागणी
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
मुंबई APMCच्या भाजीपाला मार्केटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही जावक गेट परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने व्यापारी, ग्राहक आणि वाहतूकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. तसेच जावक गेट परिसरात सुमारे 70 लाख रुपये खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात या कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई एपीएमसी अभियांत्रिकी विभागाचे भोंगळ कारभाराच्या फटका बाजार घटकांना सहन करावे लागत आहे.
बाजारघटकांच्या मते, रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना आवश्यक त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशी सुविधा निर्माण करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने संपूर्ण परिसरात पाणी साचत असून, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात रात्री दोन वाजल्यापासून सुरू होणाऱ्या भाजीपाला व्यापारावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
एकीकडे सचिव जरे यांनी बाजाराचा महसूल वाढवण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत, तर दुसरीकडे नियोजनशून्य विकासकामांमुळे व्यापारी, शेतकरी, ग्राहक आणि वाहतूकदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
याशिवाय, गरज नसलेल्या विकासकामांना मंजुरी देऊन केवळ टक्केवारीसाठी कामे काढली जात असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे, असा आरोपही काही बाजारघटकांनी केला आहे. झालेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.
राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा असलेल्या मुंबई APMCमध्ये मूलभूत सुविधांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची पणनमंत्री तथा APMCचे अध्यक्ष यांनी दखल घेऊन तातडीने चौकशी करण्याची   मागणी बाजारघटकांकडून केली जात आहे.