राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC मुख्यालय ते कांदा-बटाटा मार्केट जलमय, गटार लाईनच नाही, तरी नालेसफाईवर लाखोंचा खर्च कोणासाठी ?
पाच वर्षांत कोट्यवधींची विकासकामे तरीही पाणी निचऱ्याची व्यवस्था कोलमडली, बाजारघटकांचा संताप
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई APMCच्या मुख्यालयालगत असलेल्या कांदा-बटाटा मार्केटमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील पाच वर्षांत गाळे, लिलावगृह, प्रशासकीय इमारत, स्वच्छता, गटार व्यवस्था आणि इतर विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पावस संपून सुधा तासन्तास पाणी साचत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या प्रशासकीय इमारतीत राज्याचे पणन मंत्री तथा राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष, पणन संचालक आणि सचिव शरद जरे यांची कार्यालये आहेत, त्याच इमारतीच्या परिसरात खड्डे, पाणी साचणे , पाऊस थांबल्यानंतरही पाणी निचरा होत नाही ज्यामुळे दुर्गंधीचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुख्यालयापासून कांदा-बटाटा मार्केटपर्यंतच्या रस्त्यांवर तसेच व्यापाऱ्यांच्या गाळ्यांसमोरील धक्क्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने व्यापारी, हमाल, वाहतूकदार आणि ग्राहकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशा स्थितीत मुख्यालयालगतच्या परिसराची ही अवस्था असेल, तर इतर मार्केटची परिस्थिती किती गंभीर असेल, याचा सहज अंदाज येतो. त्यामुळे केवळ मुख्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने प्रत्यक्ष मार्केटमध्ये उतरून पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी, कामगार आणि बाजारघटकांकडून होत आहे.
बाजारघटकांच्या म्हणण्यानुसार, कांदा-बटाटा मार्केटमध्ये प्रभावी गटार व्यवस्था नसल्याने प्रत्येक पावसात परिसर जलमय होतो. त्यामुळे मालाची वाहतूक, लोडिंग-अनलोडिंग तसेच दैनंदिन व्यापारावर परिणाम होत असून कामगारांनाही चिखल आणि साचलेल्या पाण्यातून काम करावे लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचीही भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, “गटार लाईनच अस्तित्वात नसताना APMC प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी लाखो रुपये नेमके कोणत्या गटारावर खर्च करते?” असा सवाल बाजारघटकांनी उपस्थित केला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचा दावा आणि प्रत्यक्षातील परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील जयंती कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांचा दौरा प्रस्तावित असताना बाजार आवारत रस्त्यांवरील खड्ड्यांची दखल घेऊन महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी रात्री तातडीने डांबरीकरण करून रस्ते दुरुस्त केले होते. मात्र APMC प्रशासनाला आजतागायत गटार व्यवस्था, पाणी निचरा, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा करता आलेली नसल्याची टीका होत आहे.
साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती, दुर्गंधी तसेच मलेरिया आणि डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचे बाजारघटकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून गटार व्यवस्था, नालेसफाईवरील खर्च आणि विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा असलेल्या मुंबई APMCमध्ये मूलभूत सुविधांची अशी अवस्था असणे गंभीर बाब असल्याचे सांगत, पणन मंत्री तथा राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष यांनी स्वतः लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी, कामगार आणि बाजारघटकांकडून करण्यात येत आहे.
* पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे तरी मुख्यालयालगत पाणी तुंबते.
* प्रशासकीय इमारतीत पणन मंत्री, पणन संचालक आणि सचिवांची कार्यालये तरी परिसर जलमय.
* कांदा-बटाटा मार्केटमध्ये गाळ्यांसमोर व धक्क्यांवर पाणी साचल्याने व्यापारावर परिणाम.
* गटार लाईन नसल्याचा आरोप तरी दरवर्षी नालेसफाईवर लाखो रुपयांचा खर्च.
* व्यापारी, हमाल, ग्राहक आणि वाहतूकदारांना मोठा त्रास.
* नालेसफाई आणि विकासकामांच्या खर्चाची चौकशी करण्याची बाजारघटकांची मागणी.