Banana Export Crisis | युद्धाचा फटका, केळीचे हजार कंटेनर अडकले भाडेवाढीत शिपिंग कंपन्यांची लूट
-इराणमध्ये अडकलेले 800 ते 1000 कंटेनर भाडे 3 लाखांवरून 15 लाखांपर्यंत — शेतकरी व निर्यातदार दुहेरी संकटात
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा मोठा फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे पाठवण्यात आलेले जवळपास 800 ते 1000 केळीचे कंटेनर सध्या तिथेच अडकून पडले आहेत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर शिपिंग कंपन्यांनी भाड्यात तब्बल 5 ते 6 पट वाढ केल्याने निर्यातदार आणि शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. आधी 2 ते 3 लाख रुपये असलेले कंटेनर भाडे थेट 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.
केळी हा नाशवंत माल असल्यामुळे कंटेनर अडकून पडल्याने मोठ्या प्रमाणात माल खराब होत आहे. त्यामुळे एकीकडे वाढलेले भाडे आणि दुसरीकडे खराब होणारा माल अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
सुरुवातीला 1500 कंटेनर अडकले होते
युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे सुमारे 1200 ते 1500 कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. त्यानंतर 15 दिवसांनी काही कंटेनर इराणकडे रवाना करण्यात आले, तर काही स्थानिक बाजारात वळवण्यात आले.
शेतकऱ्यांचा आक्रोश
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील 50 ते 60 शेतकऱ्यांनी शिपिंग कंपन्यांकडे धडक देत जाब विचारला. मात्र काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
हिंगोलीत निर्यात पूर्ण ठप्प
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यात केळी निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सध्या केळीला केवळ 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती आहे.
इतर पिकांनाही फटका
या संकटाचा परिणाम इतर पिकांवरही झाला असून धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना अवघा सव्वा रुपये किलो दर मिळत आहे. निर्यात बंद झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
युद्ध, शिपिंग कंपन्यांची मनमानी आणि वाढलेले भाडे यामुळे केळी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.