शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! जूनमध्ये कर्जमाफी क्रॉप लोनसाठी ‘CIBIL’ची अट रद्द
बँकांना सरकारचे थेट आदेश खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं पाऊल उचलत जून महिन्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कर्जमाफी, क्रॉप लोन, बियाणे-खतांची उपलब्धता आणि पावसाच्या अंदाजावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, “राज्य सरकारने बँकांसोबत कर्जमाफीबाबत प्राथमिक चर्चा पूर्ण केली आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक माहिती कोणत्या फॉरमॅटमध्ये द्यायची आणि प्रक्रिया वेळेत कशी पूर्ण करायची याचे नियोजन करण्यात आले आहे.”
क्रॉप लोनसाठी ‘CIBIL’ची अट नाही
शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना स्पष्ट शब्दांत निर्देश दिले आहेत की, क्रॉप लोन देताना कोणत्याही शेतकऱ्याकडे ‘CIBIL स्कोअर’ची मागणी करू नये. याबाबत प्रत्येक शाखेला लेखी आदेश देण्यास सांगण्यात आले असून, बैठकीत उपस्थित असलेल्या आरबीआय अधिकाऱ्यांनीही यास दुजोरा दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
“कोणत्याही शेतकऱ्याची क्रॉप लोनसाठी अडवणूक होऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत,” असेही फडणवीस यांनी नमूद केले.
खरीप हंगामापूर्वी दिलासा मिळण्याची शक्यता
सरकारच्या या दोन मोठ्या निर्णयांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी आणि सुलभ पीककर्ज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.