हापूसच्या नावाखाली विष? फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसवर एफडीएचा मोठा छापा
तुकाराम मुंढेच्या APMCवर धडक छापा 4 टन भेसळयुक्त हापूस जप्त
निर्यात भवनात भेसळीचा खेळ उघड परदेशात   जाणाऱ्या आंब्यांवर रासायनिक फवारणी
मुंढेच्या   धडक मोहिमेने एपीएमसीतील भेसळखोर व्यापाऱ्यांचे   धाबे दणाणले ११ लाखांचे हापूस आंबे जप्त
मुंबई APMC फळ मार्केटच्या ‘एक्सपोर्ट हाऊस’ बनले ‘कचरा हाऊस’ भेसळ, घाण मध्ये होतो व्यापार
या एक्सपोर्ट हाऊसमधून मिडिल ईस्ट , युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे, फळे आणि भाजीपाला निर्यात केला जातो
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील धडक मोहिमेचा मोठा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या विशेष कारवाईत कृत्रिमरीत्या पिकवलेले ११ लाख ५० हजार रुपयांचे हापूस आंबे आणि सुमारे ४.७४ लाख रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३७ जणांना अटक करण्यात आली असून ३१ आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात वाढलेल्या हापूस आंब्याच्या मागणीचा गैरफायदा घेत काही व्यापारी आंब्यांवर थेट इथिलिनसदृश रसायनांची फवारणी करून ते कृत्रिमरीत्या पिकवत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार ३० मे रोजी फळ मार्केटमधील एक्सपोर्ट हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील एका गाळ्यावर अचानक छापा टाकण्यात आला.
या कारवाईत १,५०० किलो हापूस आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये आहे. याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका ठिकाणी सानपाडा येथे २,००० किलो आंबे जप्त करण्यात आले. या आंब्यांची किंमत सुमारे ६ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. दोन्ही ठिकाणी आंबे पिकविणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रेचा वापर करण्यास बंदी आहे. फळे पिकविण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त इथिलिन गॅस चेंबरचा वापर करण्याची परवानगी आहे. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कारवाई होणार आहे.
परदेशात निर्यात होणाऱ्या मालावरच संशयाची सावली
विशेष म्हणजे ज्या एक्सपोर्ट हाऊसमध्ये ही कारवाई करण्यात आली, तेथून मध्यपूर्व देश, युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे, फळे आणि भाजीपाला निर्यात केला जातो. या इमारतीत जवळपास ६२ गाळे असून अनेक नामांकित आयात-निर्यातदार येथे कार्यरत आहेत.
मात्र, बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, या एक्सपोर्ट हाऊसमध्ये दरवर्षी अशाच पद्धतीने आंबे कृत्रिमरीत्या पिकवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. हे आंबे केवळ निर्यातीसाठीच नव्हे तर स्थानिक बाजारातही विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे सांगितले जाते.
एक्सपोर्ट हाऊस की कचरा हाऊस?
भेसळीइतकीच गंभीर बाब म्हणजे एक्सपोर्ट हाऊसमधील अस्वच्छता. इमारतीत प्रवेश करताच जिन्यांपासून दुसऱ्या मजल्यापर्यंत कचऱ्याचे दिसून येतात. याच परिसरातून परदेशात निर्यात होणारा भाजीपाला आणि फळे हाताळली जात असल्याने स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी याच इमारतीत आग लागण्याची घटना घडली होती. त्यानंतरही स्वच्छता व सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येच आता “एक्सपोर्ट हाऊस की कचरा हाऊस?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गुटखा, पानमसालाविरोधातही मोठी कारवाई
दरम्यान, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मे दरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. ४ लाख ७४ हजार ४०७ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मोहिमेदरम्यान एकूण ३७ जणांना अटक करण्यात आली असून गंभीर नियमभंग करणाऱ्या ३१ आस्थापनांना सील करण्यात आले आहे. एपीएमसीसारख्या देशातील प्रमुख घाऊक बाजारपेठेत सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रशासनाने थेट कारवाई केल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दररोज कारवाईची मागणी
एपीएमसीतील बाजार घटकांकडून आता अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासण्या करून भेसळखोरांवर दररोज कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.