Hapus Mango Export: अमेरिकेचा ‘हापूस’ला ग्रीन सिग्नल! शुल्क शून्य; निर्यात दुप्पट होण्याची शक्यता
-5 एप्रिलपासून दररोज 5 हजार पेट्यांची परदेशवारी कोकणच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
भारत-अमेरिका वाणिज्य करारानंतर अमेरिकाने भारतीय हापूस आंब्यावर असलेले 18 ते 50 टक्के निर्यात शुल्क पूर्णपणे शून्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे आंबा निर्यातदारांसह कोकणातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
यंदा उत्पादन घटण्याची शक्यता असली तरी सुमारे 3 लाखांहून अधिक हापूस पेट्यांची निर्यात होणार असून, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असेल. 5 एप्रिल ते 5 जूनदरम्यान दररोज 5 हजार पेट्या अमेरिका, युरोप आणि आखाती देशांकडे रवाना केल्या जाणार आहेत.
1200-1400 रुपयांचे शुल्क रद्द शेतकऱ्यांना थेट फायदा
याआधी प्रत्येक पेटीमागे 1200 ते 1400 रुपये निर्यात शुल्क भरावे लागत होते. शुल्क शून्य झाल्याने हा खर्च वाचणार असून त्याचा थेट फायदा कोकणातील उत्पादकांना होणार आहे.गेल्या काही वर्षांत अमेरिकेत केसर, हापूस आणि बदामी आंब्याची मागणी लक्षणीय वाढली आहे. मुंबई Apmc होलसेल हापूस आंब्याचे व्यपारी मोहन डोंगरे यांनी सांगितलं की , 10 ते 15 मार्चनंतर बाजारात नियमित आवक सुरू होईल आणि 15 एप्रिलनंतर खरा हंगाम बहरात येईल.
विमानभाडे 400 रुपये किलो 15 शहरांत हापूसची विक्री
प्रति किलो सुमारे 400 रुपये विमानभाडे आकारले जात असले तरी अमेरिकेतील कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, मियामी, लॉस एंजेलिस, टेक्सास आणि शिकागोसह 15 प्रमुख शहरांत हापूसला मोठी मागणी आहे.
लंडन, आखाती देश आणि नव्याने ऑस्ट्रेलियामध्येही कोकण हापूससाठी बाजारपेठ खुली झाली आहे.
निर्यातीचा विक्रम 10 हजार टनांचा अंदाज
निर्यातदार   मोहनभाई यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 1200 टन निर्यात झाली होती यंदा ती वाढून 2500 टनांवर जाण्याची शक्यता आहे. देशभरातून सुमारे 10 हजार टन आंबा निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
यासोबतच 300 टन डाळिंबाची निर्यात झाली असून अमेरिकेत डाळिंबाला 260 रुपये किलो दर मिळाला आहे.
परराज्यातील आंब्याची स्पर्धा
सध्या बाजारात केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील आंब्याची आवक जास्त आहे. केरळमधून दररोज सुमारे 600 क्रेट्स येत आहेत.
परराज्यातील आंबा 200 ते 600 रुपये किलो दराने विकला जात असताना कोकणचा हापूस 1000 ते 2500 रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.बाजारत बऱ्याच व्यपारी केरळ ,कर्नाटकच्या आंबा कोकणच्या हापूस आंबाच्या नावाने विक्री करत आहे यावर एपीएमसी प्रशासनाला कारवाई करण्याची गरज आहे.
उत्पादन घट थ्रिप्स रोगाचा फटका
यंदा अवकाळी पाऊस, अति थंडी आणि दुबार मोहरामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणावर गळ झाली आहे. मोहरावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने औषधोपचार खर्च वाढला आहे.
गेल्या वर्षी याच काळात 500 पेट्यांची आवक होत होती मात्र यंदा आवक अत्यंत कमी आहे.