नाना पटोले यांचा JNPA बंदराला दौरा, शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी
JNPA बंदरात ४००० कंटेनर अडकले फळ-भाजीपाला, बासमती तांदळासह शेतमाल अडकल्याने शेतकरी-निर्यातदार अडचणीत
केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी, पंतप्रधानांना पत्र लिहिणार – नाना पटोले
नवी मुंबई :नवी मुंबईतील JNPA (जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण) बंदरात सध्या सुमारे ४ हजार निर्यात कंटेनर अडकून पडले असून त्यामध्ये फळे, भाजीपाला, मसाले, बासमती तांदूळ तसेच इतर नाशवंत शेतमालाचा मोठा साठा आहे. मागील दहा दिवसांपासून कंटेनर बंदरातच अडकल्यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच आयात-निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज JNPA बंदराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. बंदरात मोठ्या प्रमाणावर नाशवंत माल अडकून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, “सध्या मोठ्या प्रमाणावर शेतमाल निर्यातीसाठी अडकून पडला आहे. त्यामुळे शेतकरी आणि निर्यातदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल.”
तसेच मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “हे युद्ध किती दिवस चालणार हे सांगता येत नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे पटोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बंदरात अडकलेल्या कंटेनरमधील मोठ्या प्रमाणावरील नाशवंत माल खराब होण्याची भीती व्यक्त केली जात असून निर्यात पुन्हा सुरळीत करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.