मुंबई APMC फळ बाजारात काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदांची एन्ट्री; ग्राहकांमध्ये उत्सुकता
-जानेवारी ते जुलै हंगाम काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदांची बाजारात धूम
-१५० ते १९० रुपये घाऊक दर काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदांना मोठी मागणी
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: मुंबई APMC होलसेल फळ मार्किटमध्ये काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर परिसरात सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली उच्च दर्जाची सफरचंदे दाखल झाली आहेत.
या सेंद्रिय सफरचंदांना बाजारात दाखल होताच व्यापारी आणि ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथील फळ बाजारात एका गाडीतून सुमारे १ हजार खोके काश्मिरी सफरचंद दाखल होत आहेत. प्रत्येक खोक्यात १० ते १५ किलो वजनाचा माल असून, दर्जा व आकारानुसार एका खोक्यात ५० ते १२० सफरचंदांचा समावेश असतो.
या सेंद्रिय सफरचंदांचे दर दर्जा आणि आकारानुसार घाऊक बाजारात प्रतिकिलो १५० ते १९० रुपये असून, किरकोळ बाजारात हेच सफरचंद २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. आवक मर्यादित असल्याने — दिवसाला एका गाडीपेक्षा अधिक आवक होत नसल्यामुळे — हंगाम संपेपर्यंत दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळून, नैसर्गिक खत, जैविक कीटकनियंत्रण आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ही सफरचंदे पिकवली जातात. त्यामुळे चव, रंग, टिकाऊपणा आणि पोषणमूल्य या सर्व बाबींमध्ये ही सफरचंदे सरस ठरतात. याच कारणामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक सेंद्रिय सफरचंदांना प्राधान्य देत असून, मुंबई आणि उपनगरांमधील प्रतिष्ठित भागांमध्ये याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
काश्मीरमधील थंड हवामान, सुपीक जमीन आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत यामुळे येथील सफरचंद उत्पादनाला वेगळीच ओळख मिळाली आहे. सध्या बाजारात श्रीनगर येथील नामांकित ‘एन्जॉय’ ब्रँडची सफरचंदे उपलब्ध आहेत. या सफरचंदांची काढणी ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. काढणीनंतर शेतकरी योग्य साठवणूक करून ही फळे मुंबईसह देशातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवतात.
ऑक्टोबरमध्ये काढलेले पीक आणि काश्मीर ते मुंबई या सहा दिवसांच्या प्रवासानंतरही या सफरचंदांचा गोडवा आणि ताजेपणा कायम राहतो. चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे ‘रोज एक सफरचंद खा, आजारापासून दूर रहा’ हा डॉक्टरांचा सल्ला या आरोग्यदायी फळामुळे खऱ्या अर्थाने साकार होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
आपल्या देशातील मातीमध्ये पिकलेले हे आरोग्यदायी फळ ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे देशात दर्जेदार सफरचंद उपलब्ध असतानाही इराण व तुर्कीमधून आयात केलेली सफरचंदे खरेदी केली जात होती. मात्र आता काश्मीरच्या सेंद्रिय सफरचंदांमुळे ग्राहकांना उत्तम देशी पर्याय उपलब्ध झाला आहे.
— नजीर अहमद जहाँगीर(मुंबई Apmc सफरचंद व्यापारी)