कोकणच्या ‘हापूस’वर निसर्गाचा घाला; मोहोर जळून खाक, बागायतदार हवालदिल
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
कोकणची शान आणि बागायतदारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या हापूस आंबा वर यंदा निसर्गाने घाला घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा येथे आंब्याला यंदा विक्रमी मोहोर आला होता मात्र फळधारणा होण्यापूर्वीच हा मोहोर काळा पडून जळून खाक होत आहे. डोळ्यांदेखत सोन्यासारखा मोहोर मातीत मिसळताना पाहून बागायतदारांचा कंठ दाटून आला आहे.
‘तोंडाशी आलेला घास हिरावला’
या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना च्या शिष्टमंडळाने शनिवारी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात धाव घेत निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय यांच्या नेतृत्वाखाली ॲड. प्रकाश बोवलेकर, रवींद्र परब, प्रदीप सावंत, सोमा मुळीक, सदानंद गवस, सद्गुरू मुळीक, विश्राम गोवेकर, संजय मुळीक, रामचंद्र गोवेकर, मोहन आसोलकर, यशवंत सावंत, उत्तम नाईक, प्रमोद सावंत, दिलीप गावडे, महादेव गावडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
मोहोराची ‘राख’ : उत्पादनावर मोठा परिणाम
आंब्याच्या मोहोरावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळधारणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक फवारण्या करूनही काहीच उपयोग होत नसल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.
उधारीच्या विळख्यात बळीराजा
औषधे व खते उधारीवर घेतल्याने दुकानदारांचे पैसे कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मजुरी आणि मशागतीवर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. उत्पन्नाचा मार्ग खुंटल्याने जिल्हा पुन्हा कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटला जात आहे.
कोकम उत्पादकांनाही फटका
२०२५ मधील अवकाळी पावसामुळे कोकम उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. पंचनामे आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊन तीन महिने उलटले, तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा झालेली नाही. काहींना अनुदान मिळाले असले तरी निम्म्याहून अधिक शेतकरी अजूनही बँकेच्या फेऱ्या मारत आहेत.
कृषी विभागाला ‘जाब’
मोहोर जळण्यामागील नेमके शास्त्रीय कारण काय, याचे स्पष्ट उत्तर कृषी विभागाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष बागांमध्ये जाऊन पाहणी करावी आणि प्रभावी कीटकनाशकांबाबत तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा
तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
अस्मानी संकट आणि प्रशासकीय दिरंगाई यांच्या कात्रीत सापडलेल्या सिंधुदुर्गातील आंबा व काजू बागायतदारांसाठी यंदाचा हंगाम अत्यंत चिंताजनक ठरत आहे.