‘आंबा महोत्सव’ राज्यभर; शेतकरी-ग्राहक थेट जोडणार – पणन मंत्री जयकुमार रावल
-दिल्ली-मुंबईतही होणार आंबा महोत्सव शेतकऱ्यांना मिळणार नवे बाजार
-‘आंबा महोत्सव-२०२६’चा भव्य शुभारंभ ४० दिवसांत थेट विक्रीचा विक्रम अपेक्षित
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
‘फळांचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडण्याचा मोठा उपक्रम राज्य शासन राबवत असून, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
पुणे येथील मार्केट यार्डमध्ये आयोजित ‘आंबा महोत्सव-२०२६’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सभापती प्रकाश जगताप, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
रावल यांनी सांगितले की, लवकरच मुंबई आणि देशाची राजधानी नवी दिल्ली येथेही आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
सन २००१ पासून सुरू झालेली ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ ही संकल्पना आज मोठ्या स्तरावर पोहोचली असून, यावर्षी महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. यंदाचा महोत्सव सुमारे ४० दिवस चालणार असून, ६० स्टॉल्सवरून शेतकरी थेट आंबा विक्री करत आहेत. भविष्यात ही संख्या १५० स्टॉल्सपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.
या महोत्सवात कोकणातील जीआय मानांकन प्राप्त हापूस आंब्यासह केशर, पायरी आणि इतर विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. जीआय टॅगमुळे अस्सल आंब्याची ओळख पटते आणि फसवणूक कमी होते.
तसेच ‘क्यूआर कोड’ आणि ‘Know Your Farmer’ (KYF) या संकल्पनांमुळे ग्राहकांना थेट शेतकऱ्यांची माहिती मिळणार असून, पारदर्शकता आणि विश्वास वाढणार आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली मिलेट, संत्रा, काजू-बेदाणा आणि आंबा महोत्सव यांसारख्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग आहे.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले जाते. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही केशर आंब्याचे उत्पादन वाढत आहे.
शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा, मध्यस्थ कमी व्हावेत आणि ग्राहकांना दर्जेदार आंबे रास्त दरात मिळावेत, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
याशिवाय देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा अभ्यास करण्यासाठी विविध राज्यांमध्ये अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार असून, कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनावरही भर दिला जाणार आहे.उद्घाटनानंतर मंत्री रावल यांनी विविध स्टॉल्सना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.