कांद्याला भाव नाही… शेतकऱ्यांचा ‘मेलोडी’तून सरकारला टोला
नाशिकमध्ये विराट महामोर्चा मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, हजारो शेतकरी आक्रमक
नाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर विराट क्रांती महामोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. “कांद्याला प्रति क्विंटल किमान २ हजार रुपये भाव द्या” या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले असून काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली.
या आंदोलनात ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
‘मेलोडी’ वाटत अनोखा निषेध
शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान ‘मेलोडी’ चॉकलेट वाटत सरकारवर उपरोधिक टीका केली. “मेलोडी इतकी चॉकलेटी कशी? आणि कांद्याचे दर इतके कडू का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. या अनोख्या निषेधामुळे महामोर्चाची राज्यभर चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्यांचा इशारा
कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वेळेत निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. कांद्याला हमीभाव, निर्यातबंदीवरील स्पष्ट धोरण आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत या मागण्यांवर आंदोलक ठाम आहेत.
पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
मोर्चामुळे चांदवड परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.