साखरेचा ‘कडू’ दरवाढीचा फटका, सणासुदीत दर आणखी भडकण्याची शक्यता
नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसत आहे. यंदा साखरेचे उत्पादन कमी झाल्याने बाजारातील उपलब्धता घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारखान्यांमधून मिळणाऱ्या साखरेचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात साखरेने ५० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीपूर्वी नवीन साखर बाजारात दाखल झाली नाही, तर दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी गोडधोडासोबतच महागडी ठरण्याची शक्यता आहे.
कारखान्यातील साखर ४८ रुपयांवर
जानेवारी ते जूनदरम्यान कारखान्यांमधून मिळणाऱ्या साखरेचा दर प्रतिकिलो सरासरी ३५ ते ३८ रुपये होता. मात्र मागील काही महिन्यांत दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत आता कारखान्यांमधील साखरेचा दर ४६ ते ४८ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून अनेक ठिकाणी साखर ५० रुपयांच्या पुढे विकली जात आहे.
मुंबई मसाला मार्केटमधील होलसेल साखर व्यापारी रोशन मुर्गाई यांनी सांगितले की, बाजारात सध्या साखरेची उपलब्धता आणि नवीन हंगामातील आवक यावर दरांचे गणित अवलंबून आहे. नवीन हंगामातील साखर वेळेत आणि मोठ्या प्रमाणात बाजारात आली तर दर काही प्रमाणात स्थिर होऊ शकतात मात्र आवक लांबली तर सणासुदीच्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईत दरमहा ४० हजार टन साखरेचा वापर
मुंबई आणि उपनगरांमध्ये दरमहा जवळपास ४० हजार टन साखरेचा वापर होतो. यातील सुमारे ६० टक्के साखर मिठाई, बेकरी, पेये आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरली जाते, तर उर्वरित ४० टक्के साखर घरगुती वापरासाठी जाते.
त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांपुरता मर्यादित न राहता मिठाई, बेकरी उत्पादने, पेये आणि इतर साखरयुक्त पदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे.
नवीन हंगामावर दरांचे गणित
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सुमारे ३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदाचा नवीन हंगाम बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
नवीन हंगामात उत्पादन अपेक्षेप्रमाणे वाढले आणि मोठ्या प्रमाणात साखर बाजारात आली, तर दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मात्र उत्पादनाला विलंब झाला किंवा अपेक्षित आवक झाली नाही, तर सध्याची दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
आयात केली तरी साखर स्वस्त होण्याची शक्यता कमी
बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी साखर आयात करण्याचा पर्याय असला तरी आयात केलेली साखर स्वस्त पडण्याची शक्यता कमी आहे. आयात शुल्कासह साखरेचा दर प्रतिकिलो ५३ ते ५५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यात वाहतूक, साठवणूक आणि इतर खर्च जोडल्यास अंतिम ग्राहकाला ही साखर दर्जानुसार ५५ ते ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पडण्याची शक्यता आहे.
पुणे-सांगली-सातारा-कोल्हापूरकडून मुंबईला साखरेचा पुरवठा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत सध्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. या भागातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर नवीन उत्पादन बाजारात येण्यास सुरुवात होईल.
आवक वाढल्यानंतर साखरेचे दर स्थिर होण्याची किंवा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र नवीन हंगामातील साखर बाजारात येईपर्यंत सध्याची दरपातळी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
साखरेनंतर गुळाचाही भाव कडू
साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर केला जात असला तरी गुळाचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. सध्या दर्जानुसार गुळाचे दर ५० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. तर काही ठिकाणी सेंद्रिय गुळाचा दर तब्बल २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.
गणपती ,दसरा-दिवाळीत मिठाई महागण्याची शक्यता
दसरा आणि दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध गोड पदार्थांना मोठी मागणी असते. या पदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने साखरेचे दर वाढलेले राहिल्यास मिठाई, बेकरी पदार्थ, पेये आणि इतर गोड पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, साखरेचे दर कमी करण्यासाठी ऊसतोडणीचा हंगाम घाईने सुरू करणेही शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी व्यवहार्य नसल्याचे सांगितले जात आहे. उसाची पूर्ण वाढ होण्यापूर्वी तोडणी केल्यास उसाचे वजन आणि उत्पादनक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह कारखान्यांनाही बसण्याची शक्यता आहे.
आता नवीन साखर बाजारात किती लवकर येते, उत्पादन किती होते आणि सणासुदीच्या काळात साखरेचे दर कोणती दिशा घेतात, याकडे सर्वसामान्य ग्राहकांसह व्यापारी आणि मिठाई व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.