उन्हाच्या तडाख्याने भाज्या महागल्या; मुंबईत किरकोळ बाजारात दर १५० रुपयांपर्यंत
एपीएमसी न्यूज नेटवर्क:
वाढत्या उन्हामुळे राज्यातील अनेक भागांत भाजीपाल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका मुंबईतील ग्राहकांना बसू लागला आहे. उत्पादन घटल्याने मुंबईतील बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून, फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात अनेक भाज्यांचे दर १२० ते १५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यातच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने महागाई आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई एपीएमसी बाजारात सध्या दररोज सुमारे ५०० ते ५५० गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक होत असली, तरी मालाचे प्रमाण कमी झाल्याने दर वाढले आहेत. घाऊक बाजारात फरसबी ८० ते १२० रुपये किलो, मटार ८० ते ९० रुपये, घेवडा ७० ते ९० रुपये, गवार ७० ते ८० रुपये, तर शेवगा शेंगा ७० ते ९० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. याच भाज्या किरकोळ बाजारात १२० ते १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या आहेत.
भेंडी, फ्लॉवर, कोबी आणि कारली या भाज्यांचे घाऊक बाजारातील दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत गेले असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना त्यासाठी १०० ते १२० रुपये किलो मोजावे लागत आहेत.
कोथिंबिरीचे दर दुप्पट
उन्हाचा सर्वाधिक फटका कोथिंबिरीला बसला आहे. एरव्ही घाऊक बाजारात १० रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची जुडी आता २० ते २५ रुपयांवर गेली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एका जुडीसाठी तब्बल ५० रुपये मोजावे लागत आहेत.
मेथी, पालक आणि शेपू यांसारख्या पालेभाज्यांचे दरही वाढले असून, घाऊक बाजारात १५ ते २० रुपये जुडी असलेला माल किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये जुडीने विकला जात आहे.
आवक घटल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडले
उन्हामुळे उत्पादन घटणे, बाजारातील कमी आवक आणि वाढलेला वाहतूक खर्च यामुळे भाजीपाल्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले असून, पुढील काही दिवस महागाईचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे.