पणन मंत्री तथा राष्ट्रीय महत्वाचे बाजाराचे अध्यक्ष जयकुमार रावल उद्या मुंबई APMC दौऱ्यावर!
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारातील समस्यांवर होणार मंथन पाचही मार्केटची पाहणी, व्यापाऱ्यांशी संवाद अन् प्रशासकीय कारभारावरही घेणार आढावा.
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मध्ये उद्या, १२ ऑगस्ट रोजी कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला पणन मंत्री तथा मुंबई APMCचे अध्यक्ष जयकुमार रावल, पणन विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, पणन संचालक तसेच मुंबई APMCचे सचिव (MNI) यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
या बैठकीपूर्वी किंवा त्याच दौऱ्यादरम्यान मुंबई APMCच्या पाचही मार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजीपाला, फळ, मसाला, धान्य आणि कांदा-बटाटा मार्केटमधील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून व्यापारी आणि बाजार घटकांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
या पाहणीमध्ये मार्केटचा पुनर्विकास, यूजर टॅक्सचा प्रश्न, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वाहतूक व्यवस्था, शौचालयांची दुरवस्था, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या यांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले मात्र वापराविना पडून असलेले प्रकल्प आणि त्यांच्या सद्यस्थितीचा मुद्दाही या बैठकीत चर्चेत येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून दर्जा मिळाल्यानंतरही बाजारातील मूलभूत सुविधांची परिस्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारली नसल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वीही पणन मंत्र्यांनी मुंबई APMCचा पाहणी दौरा केला होता. मात्र त्यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ अस्तित्वात होते. आता राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात, याकडे व्यापारी आणि बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सध्या एका अधिकाऱ्याकडे दोन प्रमुख विभागांची जबाबदारी असल्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा बाजारात आहे. प्रशासनातील जबाबदाऱ्यांचे विभाजन, अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बाजाराच्या प्रभावी व्यवस्थापनाबाबत पणन मंत्री जयकुमार रावल काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
यूजर टॅक्स, पुनर्विकास, रखडलेले प्रकल्प, रस्ते, शौचालये आणि बाजार घटकांच्या मूलभूत समस्या यावर केवळ चर्चा होणार की प्रत्यक्ष निर्णय घेतले जाणार? हा प्रश्न या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळालेल्या मुंबई APMCच्या विकासाला या बैठकीतून नवी दिशा मिळते का, की पुन्हा एकदा आश्वासनांवरच बैठक संपते, याकडे व्यापारी आणि बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.