कोकणचा हापूस संकटात शेतकरी रस्त्यावर, पण APMC मार्केटमध्ये बंगाली टोळीचा कोट्यवधींचा धंदा?
आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शरद पवारांचा सहभाग राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठबळ
हेक्टरी ५ लाख मदतीच्या मागणीसाठी १५ मे रोजी मुंबईत महामोर्चा
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
एकीकडे कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकरी हवामान बदल, रोगराई आणि आर्थिक संकटामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत, तर दुसरीकडे मुंबई आणि पुणे बाजार समित्यांमध्ये मार्किट संचालक यांच्या पाठिंबामुळे मार्किट बंगाली टोळी सक्रिय झाली आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी असलेल्या लिलावगृह आणि गाळ्यांचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा अनधिकृत आंबा व्यापार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, बंगाली टोळीच्या माध्यमातून कर्नाटकातील आंबा “कोकण हापूस” म्हणून ग्राहकांना विकला जात असल्याने अस्सल कोकणी हापूसची प्रतिमा धोक्यात आली आहे. याहून धक्कादायक म्हणजे या टोळीला बाजार समिती प्रशासन आणि काही मार्केट संचालकांकडून गाळ्यांच्या पडद्यामागे राहण्याची सोय, अनधिकृत विक्रीसाठी सुविधा आणि संरक्षण दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य पैसे मिळत नसताना बाजार समित्यांमध्ये सुरू असलेल्या या संशयास्पद कारभारावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संबंधित यंत्रणा मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, कोकणातील आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर आता राजकीय पातळीवरही वातावरण तापू लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, १५ मे रोजी मुंबईत होणाऱ्या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने   सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील आंबा, काजू आणि नारळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा झाली. हवामान बदल, मोहोर गळती, फळमाशीचा प्रादुर्भाव, संशोधन केंद्रांची निष्क्रियता आणि आयात-निर्यात धोरणातील विसंगती यावरही चर्चा करण्यात आली.
“कोकणचा कॅलिफोर्निया धोक्यात”
कोकणाला “कॅलिफोर्निया” बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शरद पवार यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत, “फळबाग शेतीकडे होत असलेले दुर्लक्ष भविष्यात कोकणातील शेती व्यवस्थेसाठी घातक ठरू शकते,” अशी चिंता व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा यशस्वी करण्यासाठी पक्ष पुढाकार घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेक्टरी ५ लाख मदतीची मागणी
कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना अनुक्रमे हेक्टरी ५ लाख आणि ३ लाख रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते ‘वर्षा’ निवासस्थान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता टिळक उद्यान येथे सर्व आंबा बागायतदार शेतकरी एकत्र येणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानावर धडक मोर्चा नेण्यात येणार आहे.
सर्वपक्षीय सहभाग
या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माक्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, धर्मराज्य पक्ष आणि कुणबी सेना यांसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
काय घडले होते?
२०२६ च्या हंगामात अवकाळी पाऊस, धुकं आणि वाढत्या तापमानामुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मोहोर गळती, साका आणि फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे ८० टक्क्यांहून अधिक उत्पादन नष्ट झाले. परिणामी बाजारात हापूसचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या प्रश्नावर आक्रमक आंदोलन सुरू केले आहे.