मुंबई Apmc फळ बाजारात 17 हजार आंब्याच्या पेट्या दाखल, कोकणचा हापूस फक्त 6500 पेट्या, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दर किती?
गुढीपाडव्याला हापूस महाग डझनाला १५०० ते ४००० रुपये
हापूस पेटी १२ ते १५ हजार कर्नाटक आंबा १० ते १२ हजार
उत्पादन ६०–७०% घट हापूसचे दर गगनाला
बाजारात हापूसच्या नावाने कर्नाटक-केरळ आंब्यांची जोरात विक्री
नवी मुंबई :फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा बाजारात दाखल होऊ लागला असला तरी यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा आंबा ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि किडरोगामुळे कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन यावर्षी तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचे माहिती हापूस आंब्याचे घाऊक व्यापारी विजू बेंडे यांनी म्हटले आहे.
मुंबई APMC घाऊक फळ बाजारात सध्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. आज बाजारात एकूण १७ हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या असून, त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे ६ हजार ५०० पेट्या, तर कर्नाटक आणि केरळमधील सुमारे ११ हजार पेट्या आल्या आहेत. त्यामुळे यंदा बाजारात इतर राज्यांतील आंब्यांची आवक जास्त असल्याचे चित्र आहे.
उत्पादन घटल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार कोकणातील हापूस आंब्याची एक पेटी सध्या १२ ते १५ हजार रुपये दराने विकली जात आहे. तर कर्नाटकातील आंब्याची पेटी १० ते १२ हजार रुपये दराने घाऊक बाजारात विक्री होत आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण असल्यामुळे या काळात आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आतापासूनच खरेदी सुरू केली आहे. मात्र आवक कमी असल्याने यंदा दर चढेच राहण्याची शक्यता बेंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोकणातील हापूस कमी असल्यामुळे बाजारात काही गाळ्यांमध्ये हापूसच्या नावाने कर्नाटक आणि केरळमधील आंबे विकले जात असल्याचेही चित्र दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी आंबा खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन व्यापाऱ्यांकडून केले जात आहे.
किती आहेत दर?
सध्या   बाजारात हापूस आंब्याचे दर १५०० ते ४००० रुपये प्रतिडझन इतके आहेत. आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा यानुसार दरात चढ-उतार होत आहेत.
मागील वर्षी गुढीपाडव्याच्या काळात आवक जास्त असल्याने हापूस आंबा ७०० ते १००० रुपये डझन दराने उपलब्ध होता. मात्र यंदा उत्पादन घटल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, संपूर्ण हंगामात कोकणातील हापूस आंब्याचे दर जास्त राहण्याची शक्यता असून, उत्पादन घटल्याचा फटका प्रक्रिया उद्योग आणि पूरक व्यवसायांनाही बसण्याची शक्यता आहे.