मुंबई APMC स्वच्छता विभागात जाण्यास नकार, मलाईदार विभागांसाठी आग्रह!
“राष्ट्रीय महत्वाचे बाजार” स्वच्छतेचा बोजवारा! आठ महिन्यांनंतरही सचिव जरे अपयशी?
राष्ट्रीय’ दर्जा मिळाला, पण घाण काही हटेना! मुंबई APMCत नेमकं चाललंय काय?
सचिव जरे यांच्या कार्यपद्धतीवर सवाल 8 महिन्यात बैठका भरपूर, परिणाम शून्य?
राष्ट्रीय बाजारचे अध्यक्ष आणि पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या बाजारपेठेत स्वच्छतेचे प्रश्न कायम राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे
एपीएमसी न्यूज नेटवर्क : 
राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून घोषित झालेल्या मुंबई APMCमध्ये स्वच्छता आणि नालेसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्याचे पणन मंत्री तथा राष्ट्रीय महत्वाचे बाजारचे   अध्यक्ष जयकुमार रावल, पणन संचालक व सचिव शरद जरे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन असतानाही आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेली मुंबई APMC आजही अस्वच्छतेच्या विळख्यात का आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. स्वच्छता विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना अटक झाल्यानंतर विभागाचा कारभार अधिकच चर्चेत आला असून सचिव शरद जरे यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आठ महिन्यांपासून पदावर असतानाही स्वच्छता आणि नालेसफाई व्यवस्थेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही, याबाबत व्यापारी आणि बाजार घटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच बाजार समितीच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे मात्र या आगोदार सचिव जरे 8 महिन्यापासून मुंबई APMC मध्ये कार्यरत आहेत तरी सुधा या विभागात सुधारणा का झाली नाही? असे प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
दोन अधिकारी अटकेत गेल्यानंतर स्वच्छता विभागात सध्या केवळ एकच अधिकारी कार्यरत आहे. त्यामुळे विभागाचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी सचिव शरद जरे यांनी अभियांत्रिकी विभागातील दोन कार्यकारी अभियंत्यांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र, या आदेशालाच एका कार्यकारी अभियंत्याने नकार दिल्याची चर्चा समोर येत आहे. त्यामुळे सचिवांच्या आदेशांचे पालन होत आहे का? तसेच प्रशासनावरील त्यांचा धाक कमी झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्वच्छता व नालेसफाई विभागाचा कारभार रामभरोसे?
मुंबई APMCला राष्ट्रीय महत्त्वाचा बाजाराचा दर्जा मिळूनही स्वच्छता आणि नालेसफाईचे प्रश्न गंभीर बनले आहेत. बाजार समितीच्या स्वच्छता व नालेसफाई विभागाचे कामकाज अद्यापही रामभरोसे सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सचिव शरद जरे यांनी सुमारे आठ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र, इतका कालावधी उलटूनही विभागातील अनियमितता आणि कामकाजातील त्रुटी कायम असल्याचे बोलले जात आहे.
नालेसफाई, स्वच्छता व्यवस्थापन आणि कंत्राटी कामांवरील नियंत्रणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बैठकींमध्ये घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
आठ महिन्यांनंतरही प्रश्न कायमच
दोन अधिकारी अटकेत गेल्यानंतर विभागात शिस्त आणि पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही स्वच्छता विभागातील कामकाजाबाबत तक्रारी आणि चर्चा थांबलेल्या नाहीत. त्यामुळे सचिवांनी घेतलेल्या बैठका आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम नेमका काय झाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
APMCमधील स्वच्छता विभागाचा कारभार, सचिवांच्या आदेशांची अंमलबजावणी आणि प्रशासनातील शिस्त या सर्व बाबींवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे बाजार समितीतील व्यापारी, हमाल आणि इतर घटकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महत्त्वाचा दर्जा मिळालेल्या आणि राज्याच्या पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या बाजारपेठेत स्वच्छतेचे प्रश्न कायम राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याची चर्चा बाजार वर्तुळात सुरू आहे.