वर्षाला 10-12 कोटींचा खर्च… तरीही मुंबई APMC अस्वच्छच!
ACB कारवाईनंतर प्रशासनाला जाग स्वच्छता आणि नालेसफाई आता नियोजनशून्य अभियांत्रिकी विभागाच्या देखरेखीखाली?
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई APMC मधील वाढती अस्वच्छता, नालेसफाईतील अनियमितता आणि ठेकेदारकडून १५   टक्के कमिशन प्रकरणानंतर अखेर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पाचही मार्केटमधील साफसफाई आणि नालेसफाईची जबाबदारी आता नियोजनशून्य अभियांत्रिकी विभागाकडे सोपवण्यात आली असून   कार्यकारी अभियंता सुरेश मोहडे यांच्या देखरेखीखाली ही कामे होणार आहेत. तसेच स्वच्छता अधिकारी किरण घोलप यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सचिव शरद जरे यांनी दिली आहे.
यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता विभागाची जबाबदारी उपसचिव डॉ. दिपक आवटे आणि प्रभारी स्वच्छता निरीक्षक समीर म्हात्रे यांच्याकडे होती. मात्र, बाजार आवारातील साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले आणि दुर्गंधीमुळे मार्केटची परिस्थिती गंभीर झाली होती.
विशेष म्हणजे, मुंबई Apmc मध्ये स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीने तब्बल ३०० कर्मचारी कार्यरत आहेत , मात्र प्रत्यक्षात केवळ २०० कर्मचारीच काम करत असल्याचे बोलले जात आहे. बाकी १०० साफसफाई कर्मचाऱ्यांची वेतन कोणाच्या खिशात जात आहे यावर चौकशी होणे आवश्यक आहे.
दुसरीकडे दोन कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी, एक उपसचिव आणि वर्षाकाठी जवळपास १० ते १२ कोटी रुपयांचा खर्च साफसफाई व नालेसफाईवर होत असतानाही मार्केट अस्वच्छ का, असा सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नालेसफाईच्या बिलासाठी १५ टक्के कमिशन घेतल्याच्या आरोपावरून ACB ने दोन स्वच्छता अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. या कारवाईनंतर स्वच्छता व्यवस्थेवर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी अभियांत्रिकी विभागातील कार्यकारी अभियंता सुरेश मोहडे यांच्या हस्ते देखरेखीची जबाबदारी देण्यात आली मात्र प्रत्यक्ष काम होणार का ? याबाबत अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना दिसून येत नाही.
आता अभियंता विभाग आणि स्वच्छता विभाग यांचे समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, हे दोन्ही विभाग प्रत्यक्षात काम पूर्ण क्षमतेने पार पाडणार का? दरवर्षी पावसाळ्यात बाजार आवारात तुंबणारे पाणी आणि अस्वच्छतेची समस्या यंदा तरी थांबणार का? याकडे व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.