मुंबई APMC मध्ये डिजिटल क्रांती!
फास्टॅग आणि बूम बॅरियर प्रणालीमुळे मुंबई एपीएमसीत बेकायदेशीर पार्किंगला आळा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाचे मोठे पाऊल
एका क्लिकवर वाहनांची माहिती! एपीएमसी प्रशासनाची डिजिटल महसूल नियंत्रण प्रणाली लवकर होणार सुरू
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : 
आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC ) परिसरात आता डिजिटल वाहतूक व्यवस्थापनाची अंमलबजावणी होणार आहे. वाढती वाहन गर्दी, अनियंत्रित प्रवेश, बेकायदेशीर पार्किंग आणि महसूल गळती रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने फास्टॅग आधारित अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पणन संचालक तथा मुंबई एपीएमसी सचिव शरद जरे यांच्या पुढाकारातून ही प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून, बाजार आवारातील वाहतूक व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दररोज हजारो ट्रक, टेम्पो आणि पिकअप वाहनांद्वारे बाजारात शेतमालाची आवक-जावक होत असते. मात्र, माल उतरवल्यानंतर अनेक वाहने बाजार परिसरात तासन्तास उभी राहत असल्याने प्रवेशद्वारांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची समस्या सातत्याने समोर येत होती.
या पार्श्वभूमीवर टोलनाका आणि शॉपिंग मॉलच्या धर्तीवर फास्टॅग स्कॅनिंग व बूम बॅरियर प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची डिजिटल नोंद केली जाणार आहे. स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहन क्रमांक स्कॅन करून प्रवेशाची वेळ संगणकीय प्रणालीमध्ये जतन केली जाईल.
निश्चित कालावधीपेक्षा अधिक वेळ वाहन बाजार परिसरात थांबल्यास संबंधित वाहनधारकांकडून फास्टॅगद्वारे स्वयंचलित दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे अनावश्यक पार्किंग, बेकायदेशीर थांबे आणि वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
याशिवाय, या प्रणालीमुळे प्रत्येक बाजार आवारात दररोज येणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवेश शुल्क, आकारण्यात आलेला दंड आणि महसूल यांची अचूक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. परिणामी, मॅन्युअल नोंदणी कमी होऊन मानवी हस्तक्षेप आणि संभाव्य गैरव्यवहारांवरही आळा बसणार आहे.
महसूल वसुलीतील गळती रोखणे, वाहतूक सुरळीत करणे आणि संपूर्ण बाजार व्यवस्थापन अधिक पारदर्शक बनवणे या उद्देशाने एपीएमसी प्रशासनाने उचललेले हे पाऊल भविष्यात इतर बाजार समित्यांसाठीही आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.