मुंबई APMC राष्ट्रीय बाजार घोषित, संचालक मंडळ बरखास्त, पणन मंत्री जयकुमार रावळांकडे कारभार
मुंबई APMC राष्ट्रीय बाजार घोषित संचालक मंडळ बरखास्त, जयकुमार रावळांकडे सूत्रे
मुंबई APMC वर सरकारचा थेट ताबा राष्ट्रीय बाजाराचा दर्जा, संचालक मंडळ बरखास्त
राष्ट्रीय बाजाराच्या दिशेने मोठे पाऊल मुंबई APMC चा कारभार पणन मंत्र्यांकडे
शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेचा रोडमॅप जयकुमार रावळांची मोठी घोषण
मुंबई APMC मध्ये मोठी प्रशासकीय उलथापालथ राष्ट्रीय बाजार घोषित
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) संदर्भात मोठी प्रशासकीय घडामोड घडली असून राज्य सरकारने मुंबई APMC ला ‘राष्ट्रीय महत्त्वाची बाजारपेठ’ (Market of National Importance) म्हणून घोषित केले आहे. याचबरोबर आजपासून बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
कार्यभार स्वीकारण्यासाठी जयकुमार रावळ आज मुंबई APMC च्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले. यावेळी पणन संचालक तथा सचिव शरद जरे यांनी त्यांचे स्वागत केले. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्र्यांनी बाजार समितीच्या प्रशासन, आर्थिक व्यवहार आणि विविध विभागांच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेतला. आगामी काळात बाजार समितीच्या कारभारासाठी आवश्यक प्रशासकीय नियुक्त्या करण्यात येणार असून, विविध अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबतही निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई APMC मधील या मोठ्या प्रशासकीय बदलामुळे व्यापारी, हमाल, कामगार आणि शेतकरी वर्गात उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर बाजार समितीच्या भविष्यातील धोरणांमध्ये कोणते बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज : जयकुमार रावळ
कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पणन मंत्री जयकुमार रावळ यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी पीक काढणीनंतरची संपूर्ण पुरवठा साखळी मजबूत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्ड स्टोरेज, गोदामे, कृषी उत्पन्न बाजार समित्या, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात व्यवस्था बळकट करण्यावर सरकारचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जगातील सर्वात मोठ्या कृषी बाजारपेठेचा संकल्प
राज्यात राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठा विकसित करण्याचा सरकारचा मा असून भविष्यात सुमारे ११०० ते १२०० एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ उभारण्याचा संकल्प करण्यात आल्याचे रावळ यांनी जाहीर केले.
ही बाजारपेठ एअरपोर्ट, सीपोर्ट, कंटेनर पोर्ट, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेली असेल. या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीमालाला थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभावी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण
राज्यातील प्रभावी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण करण्यावर सरकार भर देणार आहे. यासाठी अनुभवी अधिकारी, माजी संचालक, माजी अध्यक्ष आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कामकाज केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निर्णय?
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची कथित पिळवणूक, अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाजार घोषित करण्याचा आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा शासन स्तरावरून करण्यात येत आहे. मात्र या निर्णयावर संबंधित घटकांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
मुंबई APMC मधील या निर्णयामुळे राज्यातील कृषी बाजार व्यवस्थेच्या भवितव्याबाबत नवी चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत सरकारकडून कोणते धोरणात्मक निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.