Mumbai APMC Seizes Farm Goods Worth ₹17.51 Cr in Drive
मुंबई APMC दक्षता पथकाची धडक मोहीम! दोन महिन्यांत 17.51 कोटींचा शेतमाल जप्त 59.90 लाखांचा दंड वसूल
-परवाना व बाजार शुल्क न भरता व्यवहार करणाऱ्या आयातदार-व्यापाऱ्यांवर कडक कारवाई नियमभंग सहन केला जाणार नाही, प्रशासनाचा इशारा
एपीएमसी न्यूज नेटवर्क : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC)च्या दक्षता पथकाने जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या दोन महिन्यांत विक्रमी कारवाई करत परवाना व बाजार शुल्क (सेस) न भरता शेतमालाची खरेदी-विक्री करणाऱ्या आयातदार व व्यापाऱ्यांवर मोठा दंड ठोठावला आहे.
या कालावधीत तब्बल 17 कोटी 51 लाख 30 हजार रुपयांचा शेतमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांवर तीनपट दंड 59 लाख 90 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
दक्षता पथकाच्या तपासात अनेक व्यापाऱ्यांनी बाजार समितीचा परवाना न घेता तसेच सेस आणि देखरेख खर्च न भरता थेट व्यवहार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित वाहनांना ताब्यात घेऊन मुख्यालयात जमा करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तीनपट दंड आकारण्यात आला आहे.
ही कारवाई बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील JNPT, तुर्भे, नेरुळ, ठाणे-बेलापूर रोड, नवी मुंबई परिसरात करण्यात आली. काही आयातदारांनी आयात केलेला शेतमाल बाजार समितीच्या हद्दीत आणण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. तसेच अनेकांकडे आयातदार परवानाही नसल्याचे आढळले.
दक्षता पथकाला बाजार फी आणि देखरेख खर्च टाळण्याचा हेतू असल्याची खात्री झाल्यानंतर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 32 (9अ व क) अंतर्गत कारवाई करून बाजार फी, देखरेख खर्च आणि अनुषंगिक शुल्क वसूल करण्यात आले.
ही संपूर्ण मोहीम मुंबई APMC चे सचिव शरद जरे यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
प्रमुख दंडात्मक कारवाई
• मे. एस.आर. इम्पेक्स – ₹9,66,312
• मे. अॅडिम्स अॅग्री इंडिया प्रा. लि. – ₹9,90,264
• मे. पूजा अॅफ्री ट्रेड – ₹8,61,872
• मे. लक्ष इंटरनॅशनल – ₹6,83,444
• इतर 10 प्रकरणांमध्येही लाखोंची वसुली
व्यापाऱ्यांना प्रशासनाचे आवाहन
बाजार समितीला सेस न भरता व्यापार करणे व बेकायदेशीररीत्या आयात करून शेतमालाची विक्री करणे हा गंभीर नियमभंग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणखी कडक पावले उचलली जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.व्यापाऱ्यांनी अनधिकृत व्यवहार टाळून बाजार समितीचा परवाना घेऊनच व्यापार करावा, असे आवाहन APMC प्रशासनाकडून करण्यात आले आहे.