श्रावणात नारळाला ‘भाव’! मुंबई APMCमध्ये मागणी वाढली, दर २५ टक्क्यांपर्यंत तेजीत
श्रावण सुरू होताच नारळाच्या मागणीत मोठी वाढ लहान नारळाला सर्वाधिक मागणी | घाऊक बाजारात १५ ते ५३ रुपये, किरकोळ बाजारात ३० ते ७० रुपयांपर्यंत दर
नवी मुंबई : श्रावण सुरू होताच मुंबई आणि नवी मुंबई परिसरात नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम बाजारभावावर दिसू लागला आहे. विशेषतः धार्मिक कार्यासाठी लहान आकाराच्या नारळाला मोठी मागणी असल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला बाजारात सध्या दररोज सुमारे ४९५ ते ५३० टन नारळाची आवक होत असून, घाऊक बाजारात नारळाची विक्री १५ ते ५३ रुपये, तर किरकोळ बाजारात ३० ते ७० रुपये दराने होत आहे.
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात नारळाला वर्षभर मागणी असते. इडली, डोसा आणि चटणीसह दैनंदिन आहारात नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर धार्मिक विधी, पूजा आणि मंदिरांमध्ये नारळाला विशेष महत्त्व असल्याने श्रावण सुरू झाल्यानंतर मागणीत आणखी वाढ झाली आहे.
दक्षिण भारतातून मोठी आवक
मुंबई APMCमध्ये सध्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतून नारळाची आवक होत आहे. तमिळनाडूमधील पोलाची तसेच आंध्र प्रदेशातील पालकोल या प्रमुख नारळ उत्पादक भागांतूनही मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात माल दाखल होत आहे.
श्रावण हा भक्तीचा महिना मानला जात असल्याने भाविक मंदिरांमध्ये देवाला नारळ अर्पण करतात. अनेक ठिकाणी नारळ फोडून प्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे सध्या मोठ्या आकाराच्या नारळाच्या तुलनेत लहान नारळाला अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
लहान नारळाच्या दरात वाढ
श्रावण सुरू होण्यापूर्वी बाजार समितीमध्ये लहान नारळाचा दर १५ ते १७ रुपये होता. आता तो वाढून १८ ते २५ रुपये झाला आहे. किरकोळ बाजारात हाच नारळ सुमारे ३० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
मोठ्या आकाराच्या नारळाचा घाऊक दर सध्या ३० ते ५३ रुपये, तर किरकोळ बाजारात ७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गणेशोत्सव, दिवाळीपर्यंत मागणी कायम राहण्याची शक्यता
मुंबई APMCच्या मसाला बाजारात सध्या सर्वाधिक आवक नारळाचीच होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. श्रावणानंतर गणेशोत्सव आणि पुढे दिवाळीपर्यंत धार्मिक तसेच खाद्यपदार्थांसाठी नारळाची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नारळाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, श्रावण सुरू झाल्यापासून लहान आकाराच्या नारळाची मागणी वाढली असून त्याच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या दक्षिण भारतातील प्रमुख उत्पादक राज्यांतून मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात नारळाची आवक होत आहे.