राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात 2026 पर्यंत दिवसा 12 तास सोलरची मोफत वीज देणार – देवेंद्र फडणवीस
अमरावती : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात २०२६ पर्यंत दिवसा तब्बल १२ तास सोलरची मोफत वीज पोहोचवण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, हे काम वेळेत पूर्ण केले जाईल, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने थोर कृषी सुधारक आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित भव्य समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतीतील सर्वात मोठी अडचण म्हणजे वीज. रात्रीच्या वेळी सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही अडचण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी राज्य शासनाने सौरऊर्जा धोरणावर भर दिला आहे. दिवसा १२ तास सोलरची मोफत वीज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि शेती अधिक शाश्वत बनेल.
ते म्हणाले, “डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण आणि कृषी क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. शेतकरी सक्षम झाला तरच राज्य आणि देश सक्षम होईल, हा विचार त्यांनी दिला. त्याच विचारांना पुढे नेत शासन शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन योजना राबवत आहे.”
या कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.