Devendra Fadnavis on Loan Waiver: राज्य सरकारची मोठी घोषणा; ₹2 लाखांपर्यंत पीककर्ज माफ
मुंबई : मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे.
सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ही कर्जमाफी योजना लागू करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीककर्ज या योजनेअंतर्गत माफ केले जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “काही जण कर्जमाफीबाबत वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, तर कोणी म्हणतं जिल्हा बँक किंवा सोसायटीचे कर्ज माफ होणार नाही. मात्र दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी ते माफ करण्यात येईल, ज्यांना पीककर्ज देण्याचा अधिकार आहे अशा सर्व बँकांचा यात समावेश असेल.”
सरकारचा प्रयत्न 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ही कर्जमाफी बँकांना नव्हे तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनांपेक्षा ही अधिक चांगली आणि परिणामकारक असेल,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीने ही कर्जमाफी अपुरी असल्याचा आरोप करत सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारची मोठी घोषणा ₹2 लाखांपर्यंत पीककर्ज माफ
-‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर
-30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार
-नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहन
-30 जूनपूर्वी कर्जमाफी अंमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न