दुहेरी संकटात राज्य: उष्णतेचा कहर, तर काही भागात पावसाचा इशारा!
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :
राज्यात सध्या हवामानाचा अनिश्चित खेळ सुरू असून नागरिकांना उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असून काही भागात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेचा प्रकोप अधिक तीव्र असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये 5 मेपर्यंत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात तापमान 43-44 अंशांवरून सध्या 42 अंशांवर आले असून ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून तापमानात आणखी घट होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामानातील या सततच्या बदलांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उष्णघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी शाळा व कोचिंग क्लासेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
याचबरोबर अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. द्राक्ष उत्पादनात तब्बल 70 टक्क्यांची घट झाली असून निर्यातही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. युरोप व अन्य देशांमध्ये सुमारे 35 टक्क्यांनी निर्यात घटली असून बांगलादेश आणि नेपाळ या बाजारपेठांमध्ये 70 ते 80 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.