राष्ट्रीय महत्वाचे बाजाराच्या नव्या रचनेत मोठी चुरस; इच्छुकांची लॉबिंग, कुटुंबीयांना बोर्डात बसवण्यासाठी हालचालींना वेग
इच्छुकांच्या नव्या खेळीला रंग चढला असून, कुटुंबातील मुलगा आणि पत्नी (बायको) यांना नव्या बोर्डात स्थान मिळवण्यासाठी लॉबिंगला वेग आला आहे.
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
मुंबई APMC ला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून सध्या संपूर्ण कारभार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र, नव्या राष्ट्रीय बाजार बोर्डाच्या रचनेत स्थान मिळवण्यासाठी बाजार वर्तुळात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
मसाला मार्केट, धान्य मार्केट, कांदा-बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजीपाला मार्केट तसेच शेतकरी प्रतिनिधी गटातून अनेक इच्छुक पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काही माजी पदाधिकारी पुन्हा बोर्डात स्थान मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे.
कुटुंबीयांना बोर्डात आणण्यासाठी लॉबिंग?
बाजार वर्तुळातील चर्चेनुसार, काही इच्छुकांनी थेट स्वतःऐवजी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणी मुलगा, कोणी पत्नी (बायको), तर काहींनी इतर नातेवाईकांना नव्या बोर्डात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. आरक्षित महिला जागांचा वापर करून कुटुंबीयांना संधी देण्याचे प्रयत्न होत असल्याचेही बोलले जात आहे.
तसेच काहीजण “वरच्या पातळीवर ओळख आहे”, “मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक आहे” अशा दाव्यांसह संपर्क वाढवत असल्याचीही माहिती बाजार घटकांकडून समोर येत आहे.
चौकशी आदेशामुळे वाढली अस्वस्थता
याच पार्श्वभूमीवर पणन संचालकांनी माजी संचालक मंडळाच्या कार्यकाळातील कामकाजाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीत—
* परवाना वाटप
* सेवा शुल्क आकारणी
* अनधिकृत बांधकामे
* बाजार समितीचे उत्पन्न व खर्च
* न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी
* इतर प्रशासकीय निर्णय
या सर्व मुद्द्यांचा समावेश असल्याने अनेक इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बाजार क्षेत्रातील जाणकारांच्या मते, चौकशीचा अहवाल आणि त्यातून समोर येणाऱ्या बाबी नव्या बोर्डाच्या रचनेवर थेट परिणाम करू शकतात. त्यामुळे काही माजी पदाधिकाऱ्यांना नव्या व्यवस्थेत स्थान मिळणे कठीण होऊ शकते, अशीही चर्चा आहे.
नव्या राष्ट्रीय बाजार बोर्डाची संभाव्य रचना (14 ते 16 सदस्य)
प्रस्तावित आराखड्यानुसार नव्या राष्ट्रीय बाजार व्यवस्थापन बोर्डाची रचना पुढीलप्रमाणे असू शकते—
* 2 मंत्री स्तरावरील पदाधिकारी (अध्यक्ष व उपाध्यक्ष)
* 3 वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी
* 4 ते 6 शेतकरी प्रतिनिधी
* 3 व्यापारी प्रतिनिधी
* 1 तज्ज्ञ सदस्य
* संयुक्त निबंधक दर्जाचा सचिव
* APEDA, वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन व स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष निमंत्रित सदस्य
बाजारात निर्णायक टप्पा
राष्ट्रीय बाजार समितीचे अध्यक्ष तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली नव्या व्यवस्थेची दिशा निश्चित होत असताना, पारदर्शक, स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि बाजार व्यवस्थेचा अनुभव असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, नव्या बोर्डात कोणाला स्थान मिळणार, कोणाची लॉबिंग यशस्वी ठरणार आणि चौकशी अहवालाचा किती परिणाम होणार, याकडे संपूर्ण बाजार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.