युद्धाच्या सावटात इंधन दरवाढीचा थेट परिणाम चणा, डाळी, तांदूळाच्या किमती वाढल्या, आणखी दरवाढीची शक्यता
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
इराण, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर दिसू लागला आहे. इंधन तुटवडा आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे अन्नधान्य व कडधान्यांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई एपीएमसी बाजारात धान्य आणि डाळींच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत ही दरवाढ आणखी तीव्र होण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी धान्य बाजारातील ‘घी ग्रेन, राईस अँड ऑइलसीड्स मर्चंट्स असोसिएशन’ (ग्रोमा)चे अध्यक्ष भीमजीभाई भानुशाली यांनी सांगितले की, इंधन तुटवड्यामुळे बाहेरून धान्य घेऊन येणारे ट्रक वेळेवर मुंबईत पोहोचत नाहीत. यापूर्वी दोन दिवसांत पोहोचणारी वाहने आता चार ते पाच दिवस उशिराने बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे बाजारात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती वाढली आहे.
मुंबईसारख्या महानगरात शेती उत्पादन होत नसल्याने संपूर्ण अन्नधान्याचा पुरवठा राज्यातील आणि देशातील विविध भागांतून केला जातो. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि इंधन टंचाईमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम बाजारभावांवर होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने १४ कृषी उत्पादनांच्या आधारभूत किंमतींमध्ये वाढ केली आहे. त्याचबरोबर एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळात उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून अन्नधान्य आणि कडधान्यांच्या किमती आणखी वाढू शकतात, असे भीमजीभाई भानुशाली यांनी स्पष्ट केले.
चणा-डाळींमध्ये मोठी वाढ
सध्या चणा आणि चणा डाळीच्या घाऊक दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. ही फक्त सुरुवात असून इतर धान्य आणि कडधान्यांचे दरही वाढू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
जानेवारी २०२६ मध्ये ६२ रुपये किलो असलेला चणा मे महिन्यात ७० रुपयांवर पोहोचला असून सुमारे ११ टक्के वाढ झाली आहे. चणा डाळ ६६ रुपयांवरून ७३ रुपये किलो झाली आहे. तूर डाळ ७८ रुपयांवरून ८५ रुपये किलो, मसूर डाळ ७२ रुपयांवरून ७८ रुपये किलो झाली आहे. उडीद ८५ रुपयांवरून ९४ रुपये किलो झाला असून उडीद डाळ ९५ रुपयांवरून थेट ११० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.
तांदळाच्याही दरात वाढ झाली असून कोलम तांदूळ ४३ रुपयांवरून ४९ रुपये किलो झाला आहे. नवीन बासमती तांदूळ ८२ रुपयांवरून ९३ रुपये किलो, तर जुना बासमती ८७ रुपयांवरून १०० रुपये किलोवर गेला आहे. ज्वारीचे दरही ३८ रुपयांवरून ४० रुपये किलो झाले आहेत.
“दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसणार”
सध्याची परिस्थिती कायम राहिली तर येत्या काही आठवड्यांत किरकोळ बाजारातही मोठी दरवाढ दिसून येईल. वाहतूक खर्च, इंधन दरवाढ आणि पुरवठ्यातील विलंब यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.