“उंदराच्या औषधामुळे मृत्यू… कलिंगड नव्हे!”
एफडीएच्या उशिरा अहवालामुळे शेतकरी-व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या “कलिंगड खाल्ल्याने कुटुंबाचा मृत्यू” या अफवेने राज्यातील कलिंगड बाजारपेठ अक्षरशः हादरली आहे. मात्र, प्रत्यक्षात मृत्यूचे कारण कलिंगड नसून उंदीर मारण्याच्या औषधामुळे विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. तरीदेखील या अफवेचा मोठा फटका गरीब शेतकरी, फेरीवाले आणि व्यापाऱ्यांना बसला आहे.
काही सोशल मीडिया अकाउंट्सनी केवळ लाईक्स आणि व्ह्यूजसाठी अपूर्ण माहिती पसरवल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. परिणामी, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होणारे कलिंगड बाजारात पडून राहिले असून विक्रीत मोठी घट झाली आहे.
दिवसाला २०० ते ५०० रुपये कमावणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे. अफवेपूर्वी २० ते २५ रुपये किलोने विकले जाणारे कलिंगड आता १० ते १२ रुपये किलो दरानेही विकले जात नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशात दरवर्षी सुमारे ५ ते ७ लाख टन कलिंगड उत्पादन होते. मात्र, एका अफवेने संपूर्ण व्यापार साखळीवर परिणाम झाला असून मोठ्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
व्यापाऱ्यांचा आरोप आहे की, अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) तपास अहवाल वेळेत आला असता तर ही अफवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली नसती. उशिरा आलेल्या अहवालामुळे भीतीचे वातावरण अधिक वाढले आणि त्याचा थेट आर्थिक फटका शेतकरी व व्यापाऱ्यांना सहन करावा लागला.
याबाबत प्रतिक्रिया देताना मुंबई APMC घाऊक कलिंगड व्यापारी पप्पू चौरसिया यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या अफवांमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकारने कठोर भूमिका घेत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”