पुढील 24 तास धोक्याचे! अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; 5 जिल्ह्यांत रेड अलर्टसदृश स्थिती
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
राज्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेड, वर्धा, परभणी, बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पुढील 24 तासही धोक्याचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि यवतमाळमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ढगाळ वातावरण आणि उकाडा यामुळे पिकांवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. वातावरणातील सततच्या बदलामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गारपिटीचा तडाखा हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील जांब जुली पारवा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गहू, हरभरा आणि ज्वारी पिके अक्षरशः आडवी झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप गावातही रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून ज्वारी पूर्णपणे खराब झाली आहे.
खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातून काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. हातातोंडाशी आलेली ज्वारी पावसामुळे निकामी झाली असून उत्पादन घटल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे.
तापमानातही तीव्र चढउतार
धुळे येथे राज्यातील नीचांकी 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोला येथे 36.8 अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले. या तीव्र बदलांचा परिणाम पिकांच्या वाढीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
शेतकऱ्यांची मदतीची हाक
सलगच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पिके वाचवण्यासाठी केलेला खर्च, खत-बियाणे आणि मजुरीचा पैसा वाया गेला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पुढील 24 तासांत हवामान आणखी बिघडण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.